← Go Back
Mutual Funds | 10 july 2021

खर्च कमी, बचत अधिक, गुंतवणूक अधिक – नव्या युगाचा, नवा अर्थमंत्र!

अतुल एक अगदी सर्वसाधारण कुटुंबातील तरुण. घरातील परिस्थितीमुळं जेमतेम कसंबसं पदवीपर्यंत शिकला. त्यानंतर छोटी नोकरी स्वीकारली. पगार फार नव्हती. पण परिस्थितीमुळं त्याला पैशाचं मोल होतं. एक एक रुपया तो खूप विचार करून खर्च करायचा. मित्रमंडळी त्याला ‘कंजूष’ वगैरे म्हणायचे. पण याचं ठरलेलं होतं. अनावश्यक खर्च टाळायचा. जिथं शक्य होईल तिथं खर्च कमी करायचा. उरलेली सगळी रक्कम बँकेत ठेवायचा. जेवढा पगार होता त्याच्या जवळपास अर्धा पगार तो सेव्ह करायचा. फारच पैशांची गरज पडली तर कधीकधी डिलीव्हरीची कामं करायचा. त्यातून वरचा खर्च भागवायचा. फार कष्ट करायचा. दरम्यान बचतीतून यानं वेगवेगळ्‌या विमा पॉलिसी, आरोग्य पॉलिसी खरेदी केल्या.

कष्टाळू आणि प्रामाणिक वृत्तीमुळे हळूहळू त्याचा पगार वाढू लागला. पगार वाढल्याने नंतर त्याची बचतही जास्त होऊ लागली. बारीकसारीक विचार करून त्याने शहरात स्वत:चं घर घेतलं. काही वर्षांनी घराशेजारीच एक गाळा विकत घेतला. तो भाड्याने दिला. उत्पन्न वाढू लागलं. काही वर्षांपूर्वी अतुलने निवृत्ती स्वीकारली आणि स्वत:च्या गाळ्यात छोटं किराणा दुकान सुरु केलं. आज अतुल व्यवसायात स्थिरावला आहे. पण त्याच्या एकूण बचतीचं प्रमाण तेवढचं आहे.

लहानपणी अतुलनं जी काही परिस्थिती पाहिली त्यातून त्यानं धडा घेतला. त्यामुळं मोठेपणी त्याला कुठंही कोणत्याही परिस्थितीत पैशांसाठी कोणाकडेच हात पसरावा लागला नाही. पण त्यासाठी त्यानं प्रचंड मेहनत, कष्ट, संयम आणि आर्थिक व्यवस्थापन आणि बचतीचा ध्यास घेतला होता.

ही एक छानशी गोष्ट. तशी खूप लहान. पण प्रत्येकजण आयुष्याचा धडा गिरवू शकतो. ज्या ज्या वेळी तुम्ही आर्थिक अडचणीत येता त्याच वेळी तुम्हाला बचतीचं किंवा आर्थिक व्यवस्थापनाचं महत्व पटतं. पण तो प्रसंग निघून गेला, की पुन्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात रममाण होता.

सध्याच्या काळात बचत हा कमावणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक आविभाज्य भाग झालेला आहे. अर्थातच सर्वचजण याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळेच तर अचानकपणे येणाऱ्या मोठ्या संकटांमध्ये पर्वताएवढी खंबीर माणसं कोसळतात. खिसा रिकामा असल्याने आत्मविश्वास संपून जातो. हे सगळं टाळणं आपल्याच हातात आहे. कसं ते या लेखात आपण पाहूयात.

‘अर्था’च्या नियोजनाशिवाय जगण्याला ‘अर्थ’ नाही!

या लेखात आपण वैयक्तिक आर्थिक नियोजन किंवा व्यवस्थापन, त्याचे लाभ, वैयक्तिक आर्थिक नियोजन कसे करायचे, आराखडा तयार करताना इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. प्रस्तूत लेखात आपण आणखी खोलात जाऊन वैयक्तिक आर्थिक नियोजनावर सविस्तर माहिती घेणार आहोत.

बचतीचा इतिहास

प्राचीन वास्तूंमध्ये सोन्याचे हंडे, दागदागिने, जुन्या सुवर्णमुद्रा वगैरे सापडल्याचं आपल्याला अनेकदा बातम्यांमधून समजतं. ते का सापडतं, तर त्यामागचं उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पूर्वीच्या काळी आताएवढी आर्थिक संस्था म्हणजेच बँका वगैरे प्रगत नव्हत्या. त्यामुळे त्याकाळची मंडळी कमावलेलं धन घराच्या खाली पुरून ठेवत असत. हीच त्यांची बचत होती. ज्यांनी पुरून ठेवलं त्यांनी जर आपल्या वारसांनी ते सांगितलं नाही तर शेकडो वर्षे ते धन तसच राहून जायचं. नंतर कधीतरी बांधकामादरम्यान ते सापडतं. मात्र, आज बचतीसाठी धन जमिनीखाली गाडून ठेवण्याची गरज नाही. कारण आज आपल्याकडे आर्थिक संस्था अत्यंत उन्नत अवस्थेत पोहोचलेल्या आहेत. बेडरूममधील बेडवर झोपूनही आपण बचत करू शकतो, एवढी आपली व्यवस्था वेगवान आणि प्रगत बनली आहे.

आपल्याकडील बँकिंग व्यवस्था जरी सामान्यांच्या वापरासाठी सहज-सुलभ झाली असली तरी भारतासारख्या विकसनशील देशात निम्न मध्यमवर्गात बचतीची जनजागृती त्यावेगाने झालेली नाही. त्यामुळेच तर आपल्याकडे गरिबी आणि श्रीमंतीमधील दरी वेगानं वाढत आहे. परिणामी गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.

बचत म्हणजे खूप कमवावे लागते, असा आपल्याकडे मध्यमवर्गात समजलेला आहे. अर्थातच बचत करायची असेल तर तुम्हाला जास्त कमवावे लागते, हे सत्य असले; तरीही तुम्ही जे काही कमावता त्यातून बचत करू शकता हे पूर्णसत्य आहे. त्यामुळे तुम्ही समजा महिन्याला पंधरा हजार रुपये जरी कमवत असाल, तरीही तुम्ही बचत करू शकता.

वैयक्तिक बचतीचे महत्व

धावपळीच्या आजच्या युगात कशाचीही शाश्वतता किंवा खात्री उरलेली नाही. अनिश्चितता, अशाश्वतता वाढत चाललेली आहे. पूर्वी शासकीय नोकरीत निवृत्तीवेतन असायचं. म्हणजे निवृत्तीनंतरही अर्धे वेतन घरबसल्या मिळत होते. मात्र १ एप्रिल २०१४ च्या नंतर रूजू झालेल्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतन योजना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर कुटुंबाच्या आणि स्वत:च्या निर्वाहासाठी उत्पन्नाचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उमेदीच्या काळात नोकरीत असताना केलेली बचत अतिशय उपयोगात येते. उतारवयात हातपाय थकलेले असताना हाताशी असलेली जमा रक्कम उर्वरित आयुष्य सन्मानाने जगण्यास पुरेशी ठरते. हे बचतीचं सर्वात जास्त महत्व आहे.

बचतीचे तीन प्रमुख लाभ आहेत.

 1. आपत्कालिन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी :

  अपघात, वैद्यकीय आजार किंवा उपचार, नोकरी सोडावी लागली किंवा व्यवसाय ठप्प झाला तर अशा परिस्थितीत बचत केलेली रक्कम माणसांपेक्षा मोठा आधार ठरते.

 2. खरेदी :

  आयुष्यात आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करावी लागते. त्यामध्ये जीवनावश्यक गोष्टींसह इतर काही गोष्टींसाठी खर्च करावा लागतो. त्यामध्ये घर, फर्निचर, घरातील वस्तू, दागदागिने, कपडेलत्ते, वाहन इत्यादी बाबींचा समावेश असतो. महिन्याकाठी विशिष्ट रक्कम पगार म्हणून स्वीकारणाऱ्या नोकरदाराला एवढा मोठा खर्च पगारातून करणे शक्य नसते. अशावेळी बचतीची रक्कम उपयोगी पडते.

 3. संपत्ती निर्माण करणे :

  भारतीय व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण समजल्या जाणाऱ्या संपत्ती निर्माण करण्यामध्ये बचत खूप उपयोगी पडते. संपत्तीमध्ये स्थावर मालमत्ता, दागदागिने, बँक डिपॉझीट, अतिरिक्त वाहने वगैरे बाबींचा समावेश होऊ शकतो.

याशिवाय बचतीमधून स्वयंपूर्ण असल्याचा आणि हाताशी पैसा असल्याचे समाधान वाटते. त्यायोगे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नियमित मासिक खर्चाचा एकाएकी ताण निर्माण होत नाही. त्यामुळे मन स्थिर राहते आणि मानसिक समाधान मिळते. नियोजनबद्ध बचत करून समृद्धी प्राप्त केल्याने समाजातही प्रतिष्ठेचं स्थान निर्माण होण्यास मदत होते.

बचत किती करावी?

बचत किती करावी याबद्दल निश्चित असे परिमाण नाही. प्रत्येकाच्या गरजा, उत्पन्न आणि खर्च यावर बचतीचे प्रमाण अवलंबून असते. मात्र, तज्ज्ञांच्या मते एका व्यक्तीने त्याच्या मासिक उत्पन्नाच्या किमान ३०% रक्कम बचत करायला हवी, असे सुचविण्यात येते. काही गुंतवणूक तज्ज्ञ तर असाही सल्ला देतात की मासिक उत्पन्न हातात पडले की सर्वप्रथम बचतीची रक्कम बाजूला काढून ठेवायची आणि नंतर उर्वरित रकमेतून इतर खर्च करायचे, असा सल्ला देतात.

भारतीय व्यवस्थेमध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती ५०-३०-२० या पद्धतीने बचत करत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झालेले आहे. म्हणजे एक व्यक्ती त्याच्या एकूण मासिक उत्पन्नाच्या ५०% रक्कम नियमित घरखर्चासाठी वापरतो. त्यामध्ये घराचे भाडे किंवा हप्ता, किराणा-दूध, शिक्षण, मनोरंजन, प्रवास, इंधन इत्यादींसाठी केला जातो. त्यानंतर ३०% रक्कम ही दीर्घकालीन खर्चाचे उद्दिष्टे गाठण्यासाठी बचत केली जाते. त्यामध्ये स्वत:चा विवाह, त्यानंतर अपत्यांचे शिक्षण-विवाह आणि निवृत्तीनंतरची तरतूद यासाठी केला जातो. तर उर्वरित २०% खर्च हा अल्पकालीन खर्चाच्या उद्दिष्टांसाठी राखीव ठेवला जातो. त्यामध्ये वाहन खरेदी, पर्यटन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी तसेच तातडीचा वैद्यकीय खर्च किंवा दानधर्म इत्यादींसाठी केला जातो.

बचत कशी करावी?

बचत कशी करावी यासाठी काही खालील महत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

 • नियमितपणे उत्पन्न आणि खर्च यांचा तपशील नोंदवून ठेवा. नोंदी ठेवल्याने जास्त खर्च कुठे होतो हे नेमकेपणाने लक्षात येते.
 • एकदा नियमित खर्चाचा ढोबळ आकडा निश्चित झाला की त्याप्रमाणे साधारणपणे किती बचत करता येईल, याचा अंदाज मांडा.
 • अनावश्यक खर्च कसा टाळता येईल आणि तो बचतीकडे वळवता येईल, याचा विचार करा.
 • बचतीचे उद्दिष्ट ठरवा. म्हणजे प्रचंड कष्टाने कमावलेल्या एक एक रुपयाची बचत करताना खूप विचार करणे आवश्यक असते. आरोग्य विमा हा वैद्यकीय खर्च कमी करण्याचा सर्वांत प्रभावी-सोपा आणि आवश्यक मार्ग आहे. तुमच्या पहिल्या बचतीतून तुम्ही कुटुंबातील सर्व व्यक्तींचा आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी किंवा कोणत्याही खाजगी मात्र विश्वसनीय कंपनीकडून तुम्ही वार्षिक आरोग्य विमा खरेदी करू शकता.

आपल्याकडे बचत करताना ‘जोखीम’ हा प्रमुख घटक विचारात घेतला जातो. प्रत्येकजण ‘कमी जोखीम निश्चित परतावा’ आणि ‘जास्त जोखीम जास्त परतावा’ या दोनपैकी एक धोरण स्वीकारून बचत करतो.

कमी जोखीम निश्चित परतावा -

यामध्ये गुंतवणुकीचे खालील मार्ग उपलब्ध आहेत. - सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) - शासकीय अधिकृत आणि विश्वसनीय बँकांतील मुदत ठेव (Fixed Deposit), - शासकीय अधिकृत आणि विश्वसनीय बँकांतील आवर्ती ठेव (Recurring Deposit) - भारतीय डाक खात्यातील (पोस्ट) विविध योजनांमधील गुंतवणूक - अटल निवृत्ती योजना - राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

जास्त जोखीम जास्त परतावा -

यामध्ये खालील मार्ग उपलब्ध आहेत - शेअर मार्केट - म्युच्युअल फंड

याशिवाय गुंतवणुकीसाठी खालील कमी जोखमीचे मार्गही उपलब्ध आहेत

 - मालमत्ता
 - सोने

बचतीच्या माध्यमातून जमवलेला पै न पै आपण कष्टाने कमावलेला असतो. प्रत्येक ठिकाण आपण आवश्यक तो कर भरून कमावलेला असतो. शिवाय अनेक ठिकाणी गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यावरही कर भरावा लागतो. त्यामुळे बचतीतील गुंतवणुकीतून मिळालेला परतावाही सुयोग्य ठिकाणी खर्च करायला हवा. तसेच त्यातूनही बचत करता येणे शक्य असते. भविष्यकालीन तरतूदींसाठी त्यातूनही शक्य असल्यास आवश्यक ती करायला हवी.

मंडळी, तुम्ही वरीलपैकी कोणत्या ना कोणत्या मार्गाने बचत गुंतवत असालच. मात्र, तुम्ही वरीलपैकी कोणत्याही मार्गाने बचतीतील पैसा गुंतवत नसाल किंवा बचतच करत नसाल, तर मात्र तुम्ही धोक्याच्या दिशेने वाटचाल करत आहात. वेळीच सावरा. खर्च नियंत्रित करा आणि बचतीवर लक्ष केंद्रीत करा. लक्षात ठेवा, पैसा पैशाकडेच ओढला जातो! धन्यवाद!

Similar Articles
logo
Mutual Funds
पुढच्या पिढीला श्रीमंत करण्यसाठी ‘अर्थसंस्कार’ करणे महत्वाचे!
July 27, 2021
Read Now
>
logo
Mutual Funds
बचत आणि अतिरिक्त उत्पन्न श्रीमंतीकडे जाण्याचा राजमार्ग!
July 20, 2021
Read Now
>
logo
Mutual Funds
खर्च कमी, बचत अधिक, गुंतवणूक अधिक – नव्या युगाचा, नवा अर्थमंत्र!
July 10, 2021
Read Now
>
logo
Mutual Funds
‘अर्था’च्या नियोजनाशिवाय जगण्याला ‘अर्थ’ नाही!
June 28, 2021
Read Now
>
logo
Mutual Funds
5 Advantages Of ELSS Mutual Funds
January 06, 2020
Read Now
>
logo
Mutual Funds
5 Mistakes To Avoid While Investing In Mutual Funds
November 25, 2019
Read Now
>
logo
Mutual Funds
Why should you choose Mutual Funds instead of Stocks?
November 01, 2019
Read Now
>
logo
Mutual Funds
Invest Early, Retire Early
July 25, 2019
Read Now
>