अजय हा अतिशय सरळमार्गी, हुशार माणूस. वडिलांच्या अकाली निधनामुळे त्याला ग्रॅज्युएशननंतर शिकता आलं नाही. त्यामुळं पटकन नोकरी करावी लागली. त्याला स्वत:चं घर किंवा जमीन काहीही नव्हतं. नोकरीत सुरुवातीला पगार तुटपुंजा होता. पण याची मेहनत, प्रामाणिकपणा आणि कष्टामुळे तो वाढत गेला. दोन वर्षांपूर्वीच अजयने मोठ्या पॅकेजची नवी नोकरी स्वीकारली होती. अजय प्रचंड स्वाभिमानी आणि कष्टाळू होता.
अजयची पत्नी नोकरी करत नव्हती. घरात उत्पन्नाचं दुसरं काही साधन नव्हतं. त्यामुळे आई, पत्नी आणि एक मुलगी या सर्वांचं अजयच बघायचा. जे येईल त्यात अजयला सगळं काही बघावं लागत होतं. पण तरीही अजयचं सुरळित चाललं होतं. सुरुवातीपासूनच आईचं आजारपण, मुलीची फी आणि घरखर्च यातच अजयचा खूप खर्च व्हायचा. एक क्रेडिट कार्डही त्यानं घेतलं होतं. त्याचे महिन्याला फक्त मिनिमम ड्यु दीड वर्षांपासून तो भरत होता. या सर्व प्रकारामुळे एक एलआयसीची पॉलिसी सोडली तर अजयनं बचतीकडं लक्षच दिलं नाही. जे येईल ते खर्च करून तो मोकळा व्हायचा.
मागील वर्षी करोना आला. दुर्दैवानं अजयची आई आजारी पडली. ब्लडप्रेशर, शुगरमुळे ॲडमिट करावं लागलं. जवळपास काही लाखांचा खर्च होण्याची शक्यता होती. अजयने पीएफचे पैसे काढले. ते मिळेपर्यंत मित्रांकडून काही पैसे उसने घेतले. ते कमी पडले म्हणून पत्नीचे दागिने गहान ठेवावे लागले. हे सगळं करेपर्यंत खूप वेळ लागणार होता.
दवाखान्यात तातडीची गरज म्हणून त्यानं काही रक्कम तब्बल १०% मासिक व्याजानं तातडीने घेतली होती. आईची तब्येत जास्त खराब झाल्यानं ऑक्सिजन, आयसीयु वगैरे उपचारांसाठी खर्च वाढत गेला. जे काही होतं नव्हतं, ते सगळं संपलं. अशातच करोनामुळे पगारकपात झाली. अजय अक्षरश: प्रचंड आर्थिक अडचणीत आला. नंतर स्वत:चा स्वाभिमान बाजूला ठेवून अजयला नातेवाईक, उधारी-पाधारी, ऑफिसमधील सहकारी, बायकोच्या माहेरहून पैशांची जमवाजमव करावी लागली.
अजय सुरळित सुरु असलेलं आयुष्य एका घटनेमुळे बिघडलं. त्याची रात्रीची झोप उडाली. रात्ररात्र त्याला झोप येत नव्हती. आयुष्यभर सांभाळलेला स्वाभिमान गहाण टाकून अजयला सर्वांकडे पैशासाठी हात पसरावे लागले. त्याच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. या परिस्थिथीमुळे अजयची पत्नीही त्याला ‘आतापर्यंतच्या आयुष्यात काय केलं?’ असं म्हणत टोमणे मारत आहे.
नंतर आईची तब्येत हळूहळू सुधारत आहे. पण अजयची आर्थिक परिस्थिती आज आयसीयूमध्ये आहे. आता तो कसाबसा सावरत आहे. पण एक रुपयाही बचत केली नसल्याचा अजयला खूप पश्चाताप झाला. भविष्याची तरतूद सोडा, अजय सध्या कसं बसं जगत आहे. ‘अर्था’च्या नियोजनाशिवाय जगण्याला ‘अर्थ’नाही, याचा अर्थ अजयला आज चांगलाच समजला आहे.
ही झाली अजयची कहाणी. पण आपल्या आजूबाजूलाही असे अनेक अजय असतात. आपल्याला लहानपणी शाळेत खूप काही शिकवलं जातं. त्यामध्ये अन्न, वस्त्र व निवारा या प्रमुख गरजा असल्याचं सांगितलं जातं. पण या तीन गरजा पूर्ण करण्यसाठी पैसा लागतो हे थेटपणे कधीच सांगितलं जात नाही. मग एक दिवस विद्यार्थ्याचे शाळा-कॉलेज संपून जाते. तो जगाच्या शाळेत प्रवेश करतो आणि तिथूनच त्याचं खरं शिक्षण सुरु होतं.
मग आयुष्याच्या जगात पैसा हेच सर्वांत मोठ्ठं सामर्थ्य आहे हे कटू सत्य त्याला हळूहळू कळू लागतं. अर्थातच हॉस्टेलवर किंवा शिक्षणासाठी परगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याची काही अंशी जाणीव विद्यार्थी दशेतच होते. पण पूर्ण जाणीव ही जगाच्या शाळेत आयुष्याचा शोध घेतानाच होते. प्रत्येकाला आपल्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी पैसा लागतो. हे जगातील कोणताही माणूस नाकारू शकत नाही. भलेही या गरजांचे आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे प्रमाण कमी अधिक असेल. पण पैसा लागतो हे वास्तव आहे. हेच सत्य आहे. पैशानं सुख विकत घेता येत नाही, असं आपण म्हणतो. पण पैसा नसताना माणूस सुखी असतो का? अर्थाशिवाय जगण्याला अर्थ नाही!
कोणी कितीही हुशार, विद्वान, चतुर आणि चाणाक्ष असले तरीही त्याची पात्रता त्याच्या खिशात असलेल्या पैशांवरूनच केली जाते. म्हणजे त्याचं मासिक उत्पन्न, त्याची संपत्ती, दागदागिने इत्यादींवरून त्याची श्रीमंती ठरविली जाते. हे चूक आहे की बरोबर हा स्वतंत्र विषय आहे. पण हे वास्तव आहे, हे नाकारून चालणार नाही.
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगात पैशाचं महत्व समजावून सांगणे आवश्यक आहे. त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम आपल्या संपूर्ण समाजावर बघायला मिळू शकतो. म्हणजे हे शिक्षण शाळेतच दिलं जावं असं काही नाही. अर्थात कार्यानुभवसारख्या विषयांतील काही विषयांमधून जाता जाता हे महत्व पुसटसं समजून सांगण्याचा प्रयत्न शालेय स्तरावर होतो. पण तो प्रभावी, परिणामकारक आणि पुरेसा नाही. त्यात आणखी सविस्तरपणा आणि स्पष्टपणा असायला हवा. विद्यार्थ्यांना जर, शालेय जीवनापासूनच पैशाचे महत्व पटले तरच त्याच्या पुढील आयुष्यात योग्य आर्थिक व्यवस्थापन होईल.
जगातील बहुतांश समस्या, अडचणी आणि गुन्हे हे पैशाअभावी होतात. कलियुगात माणसं पैशासाठी माणसांना मारायला तयार होत आहेत. आपली ‘काया’ (देह) विकून जगातील स्त्री-पुरुष ‘माया’ (पैसा) गोळा करत आहेत. आपला अहंकार, स्वाभिमान, आत्मसन्मान विकून खूप संपत्ती कमाविण्याच्या हेतूने नेत्यांच्या मागे ‘गरीब’ कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे.
आज आपल्या आजूबाजूला आज प्रचंड स्पर्धा आहे. जग हे दररोज प्रचंड व्यावहारिक बनत चाललं आहे. इंच इंच जमिनीसाठी गुन्हे घडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. करोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण जगातील छोटे-मोठे व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत.
लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प शासकीय नोकरींची उपलब्धता, यांत्रिकीकरण, सर्व क्षेत्रात अधिकाधिक स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. या सर्वांमुळे नोकरीमध्ये अनिश्चितता, अशाश्वतता आणि परावलंबित्व अधिकाधिक तीव्र होत चाललं आहे. निवृत्तीवेतन ही संकल्पना केवळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पैशाचं महत्व पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झालं आहे. तरुणवयात अधिक कष्ट करून उतारवयाचे नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी दुसरं तिसरं कोणी नव्हे तर फक्त आणि फक्त वैयक्तिक आर्थिक नियोजन महत्वाची भूमिका बजावते. पैशांचं चांगलं नियोजन केलंत तर तुमच्यावर आर्थिक परिस्थितीमुळे वाईट वेळ कधी येणार नाही.
वैयक्तिक आर्थिक नियोजन किंवा व्यवस्थापन नोकरी किंवा व्यवसाय सुरु झाल्यापासून आपण काहीतरी कमावत असतो. तो आकडा महत्वाचा नाही. पण उत्पन्न सुरु झालेले असते. त्यामुळे उत्पन्न सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून वैयक्तिक आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते. जेणेकरून वर सांगितलेल्या कथेतील अजयसारखी परिस्थिती आपल्यावर ओढवणार नाही. उत्पन्न कितीही असले तरीही त्यातून काही अंशी का होईना बचत करायलाच हवी. त्याला काही पर्याय नाही.
वैयक्तिक आर्थिक नियोजन म्हणजे प्रत्यक्ष हातात येणारे मासिक (किंवा वार्षिक) उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ साधणे. म्हणजे दैनंदिन खर्च, घरखर्च, कर्जाचे हप्ते, इतर कर्जाचे हप्ते याशिवाय शिस्तबद्ध गुंतवणुक, भविष्यातील तरतूद, आकस्मिक खर्च या सर्व खर्चांसाठी योग्य ते नियोजन करणे. सर्वांमध्ये खर्चाचा प्राधान्यक्रम ठरविणे महत्वाचे असते. वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये वेळोवेळी आर्थिक आराखडा तयार केला जातो. जर अजयने असा आराखडा तयार केला असता तर कदाचित त्याच्यावर एवढी वाईट वेळ आली नसते.
पैशाच्या मागे जावू नका असं; पण पैशाला सोडून देऊ नका! कोणाला किती पैसा मिळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे जे काही मिळतय त्याचं योग्य नियोजन करत उत्पन्नाचे स्रोत वाढवायला हवेत. आपलं कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तिक, मानसिक, शारीरिक, भावनिक स्वास्थ्य बिघडू न देता आपण आपलं आर्थिक नियोजन करायला हवं. सगळं काही सोडून पैशाच्या मागे धावत जावू नये. पण याचा अर्थ असा नाही की पैशाला सोडून द्यावं. तर सुयोग्य नियोनातून आहे त्या उत्पन्नात प्रगती करत पुढे जात रहायला हवं. पैसा पैशाच्या मागे जातो, असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजेच तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून पैसा बचत करत गेलात, तर अल्पावधीतच पैसा तुमच्याकडे येत राहील. त्याआधी आपल्याला वैयक्तिक आर्थिक नियोजनाकडे वळायला हवे!
वर अजयची गोष्ट आपण बघितलीच. पण आपण जर योग्यवेळी योग्य आर्थिक नियोजन केले नाही तर बघा काय काय प्रसंग ओढवू शकतात.
वैयक्तिक आर्थिक नियोजनाचे अनेक फायदे असून ते करणं सध्याच्या काळात अनिवार्य आहे. समजा, ते केलं नाही तर होणारं नुकसान भरून न येणारं आहे. वैयक्तिक आर्थिक नियोजन करून निश्चिंत रहायचं की नियोजनअभावी होणाऱ्या त्रासात झुरत आयुष्य कुढत बसायचं, हे शेवटी प्रत्येकाच्या हातात आहे.