अतुल हा एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा. लहानपणापासून प्रचंड लाडका. त्याच्या घरात आई-बाबा आणि एका लहान बहिण राहत होती. त्याच्या वडिलांची बांधकाम व्यावसायिक होते. त्यांची एक छोटी कंपनी होती. एका मोठ्या शहरातील उच्चभ्रू सोसायटीत असलेल्या फ्लॅटमध्ये ते राहत होते. पैसा येतो कुठून आणि कसा खर्चायचा याची काही जाणीवच अतुल आणि त्याच्या बहिणीला नव्हता. अशाच परिस्थितीत कुणाल मोठा झाला. कॉलेजात जायला लागला. वडिलांचा व्यवसाय, बँकेचे व्यवहार, गुंतवणूक वगैरे सगळं काही अतुलचे बाबाच बघत असत. अतुलला फक्त जेवढे पैसे हवेत तेवढे दिले जायचे. अतुल दिलेल्या पैशांचं काय करतो, हे देखील त्याचे आईबाबा त्याला विचारत नसत. आपल्याला लहानपणी खूप दारिद्र्यात काढावे लागले, पण मुलांना काही कमी पडायला नको असा विचार करत अतुलचे आईबाबा दोन्ही मुलांना हवं ते आणून देत असत. अशा परिस्थितीत या कुटुंबाने बचतीवर कमी आणि खर्चावर जास्त लक्ष दिलं.
एकेदिवशी अचानक अतुलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. अचानक ओढवलेल्या या परिस्थितीमुळे अतुलच्या कुटुंबियांवर आघात झाला. निधनानंतर सुरुवातीला काही दिवस पूर्वीप्रमाणेच व्यवस्थित गेले. मात्र, नंतर अचानक वडिलांसोबत काम करणाऱ्या मंडळींनी व्यवसाय मागील अनेक वर्षांपासून तोट्यात असल्याचे सांगून कंपनी तोट्यात असल्याचं सांगितलं. बँकेचे थकलेले हप्ते, प्रलंबित बांधकाम प्रकल्प यामुळे सगळं काही विकावं लागलं. अगदी राहता फ्लॅटही विकण्याची वेळ आली. शिवाय वडिलांच्या व्यवसायाचं किंवा व्यवहारांचं काहीच ज्ञान किंवा माहिती नसल्याने अतुलला वडिलांचे सहकारी जे सांगतील ते मानावं लागलं.
अचानकच अशी सगळी परिस्थिती ओढवल्याने अतुल हताश झाला. नैराश्यात गेला. आईने आत्महत्या केली. तर अतुल आणि त्याची बहिण एका भाड्याच्या खोलीत राहू लागले. एरवी परिस्थिती चांगली असताना प्रत्येक पार्टीत आवर्जुन उपस्थित राहणारे ‘आप्तस्वकीय, नातेवाईक’ आता अतुलकडे फिरकेनासे झाले. अतुल आता स्वत:ला सावरत सावरत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे सगळं त्याच्यासाठी फारच अवघड जात आहे.
अतुलला आणि त्याच्या कुटुंबियांनी अशी परिस्थिती टाळता आली असती. मात्र, त्यांच्यावर ‘आपल्याला जे मिळालं नाही ते मुलाला मिळावं’ या अविवेकी विचारानं घेरलं होतं. मुलांना हवं ते सगळं द्यावं, पण हे सगळं येतं कुठून, ते कोण आणि कसं मॅनेज करतं, मोठ्ठं झाल्यावर हे सगळं कशा पद्धतीने मॅनेज करायचं आणि अकस्मिक अनाकलनीय प्रसंगांत हे सगळं कसं सावरायचं याची माहिती देणं अनिवार्य आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात कोणाचं कधी काय होईल, काहीही सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर अतुलची गोष्ट आपल्याला बरचं काही सांगून जाणार आहे. बचत, अर्थव्यवस्था, अर्थकारण, अर्थव्यवस्थापन या सर्व गोष्टी अधिक सुलभपणे आणि मोठ्या प्रमाणात शाळेतच सांगणे अर्थात मुलांच्या मनावर अर्थसंस्कार बिंबवणे आवश्यक असते. मात्र, आपल्याकडील विद्यमान शिक्षणव्यवस्थेत या गोष्टींचा समावेश नाही, ही एक मोठी त्रुटीच म्हणावी लागेल.
आपल्यानंतर आपल्या मुलांना आर्थिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यासाठी काही गोष्टी मुलांना सांगायलाच हव्यात. त्या अशा –
पैशांचं महत्व आणि तो कसा, कुठे आणि किती खर्चावा याबाबत मुलांना जागरूक करून साक्षर करायला हवं. दररोजच्या गरजांसाठी जसे की, किराणा, गॅस, दूधबिल, शालेय फी वगैरेंसाठी पैसा येतो कुठून याबद्दल मुलांना समजेल अशा भाषेत समजून सांगायला हवं. तसेच खर्च करत असलेला एक एक रुपया विचार करून खर्चायला हवा, हे ही समजावून सांगायला हवं.
मुलांना कोणत्याही कारणासाठी तुम्ही किंवा इतर कोणीही दिलेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब नोंदवून ठेवायला सांगा. तसेच तुम्हाला जर मुलांनी पैसे मागितले तर ते कशासाठी लागणार आहेत, हे विचारून घ्या. मुलांकडे पैसे देण्यापेक्षा त्यांना जे काही हवं आहे ते तुम्ही आणून द्या किंवा त्यांना सोबत घेऊन खरेदी करा. मुलांकडे पैसे देणे शक्यतो टाळा. पॉकेटमनीच्या खर्चाचाही तपशील वेळोवेळी मागवून घेत रहा. याचा परिणाम असा होईल की मुलांना निरर्थक ठिकाणी पैसे खर्च करता येणार नाहीत. तसेच व्यसन किंवा अन्य वाईट प्रकारांपासून मुले दूर राहण्यास मदत होईल.
तुमच्या आर्थिक व्यवहारांबद्दल तुमच्या मुलांना किशोरवयीन वयापासून हळूहळू माहिती करून द्यायला हवी. विशेषत: कर्जे, कर्जाचे उर्वरित हप्ते, मित्रमंडळी किंवा स्नेहीजनांकडून घेतलेले हातउसने, व्यवसाय करत असल्यास येणी आणि देणे यांची सविस्तर माहिती मुलांना द्यावी किंवा कुठेतरी सुरक्षितपणे नोंदवून ठेवावी. तसेच कुठे नोंदवून ठेवली याबाबत मुलांना माहिती द्यावी.
तुम्ही तुमचे उत्पन्न कोणकोणत्या माध्यमात (जसे की बँकेतील एफडी, शेअर मार्केट इत्यादी) किती प्रमाणात गुंतवले आहे, याबद्दल मुलांना माहिती द्यायला हवी. याशिवाय खरेदी केलेल्य विमा पॉलीसीज, आरोग्य पॉलीसीज त्यांचे नियम याबद्दलही माहिती द्यायला हवी. त्यासंबंधित कागदपत्रे कुठे ठेवलेले आहेत याचीही मुलांना कल्पना द्या. शक्य त्या ठिकाणी संबंधित विमा सल्लागार, एजंट, कर सल्लागार, सीए यांचे क्रमांकही एका ठिकाणी लिहून त्याबाबत मुलांना माहिती द्यावी.
मुलांनी आर्थिक बाबतीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य पद्धतीने मुलांना समजेल अशा भाषेत समाधानकारक उत्तर द्या. आर्थिक बाबतीतील काही संकल्पना मुलांना सहजपणे समजून घेणे अवघड असते. समजा तुम्ही नोकरी करत असाल तर कदाचित ‘तुमचा पगार किती आणि एवढाच का’ असे प्रश्नही मुलं विचारू शकतात. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थित उत्तरे द्या.
जगात पैसे कमावण्याची गरज मुलांना पटवून द्या. सोबतच कमावलेल्या पैशातून बचत करणं अनिवार्य असल्याचं पटवून सांगा. बचत हा जीवनाचा एक भाग आहे, असे संस्कार मुलांवर करा. काहीही बचत न करणं म्हणजे काहीही न कमावण्यासारखं आहे, एवढ्या प्रकर्षानं मुलांना बचतीचे महत्व पटवून सांगा.
अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून मुलांना अर्थसंस्कारीत करायला हवं. मुलांना त्यांच्य पालकांनी अर्थसंबंधी गोष्टी सुयोग्य शब्दांत समजावून सांगणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे, तर आजी, आजोबा आणि घरातील सर्व जबाबदार सज्ञान व्यक्तीने याकामी पुढाकार घ्यायला हवा. मात्र, मुलांना निरुत्साही किंवा निरव वाटणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
चला, तर मग आपल्या मुलांना अर्थसंस्कारित करू आणि आपल्या पुढच्या पिढीला श्रीमंत करू!
धन्यवाद!